Friday, June 21, 2024

सापडलेले असते उत्तर


 
सापडलेले असते उत्तर

उंच, उंच कारंजे बनुनी, कविता स्फुरते कवी मनातून

जसे उमलते फूल कळीतून, तशी जन्मते कविता आतून.

 

साद मनीचा नाद होऊनी, कधी कुणाला सुचती गाणी

बनून मखमल हरित तृणांची, स्वये रेखिते ‘ती फुलराणी’.

 

‘जीवन देई मम बाळाला’, अशी करोनी आर्त विनंती

जीवीत करते अंगाईला, गाउनी ‘बाळा जो जो’ गाई.

 

शैशवाताला मोर बनूनी, नाचवते ती अमराईही

कुशी बसवते ती सर्वांना, होऊनी राणी  दख्खनची ती.

 

सखी बनुनी आर्त मारीते, हाक ‘जिवलगा’ ऐक सांगते

कधी पाहुनी ‘तोच चंद्रमा’, मंथन करीते गत दिवसांचे.

 

मान्य करोनी लाख चुकांना, ‘अखेरचे’ हे शब्द सांगते 

ओठावरले गाणे बनुनी, कधी कुणाचे आसू पूसते.

 

माय बनवूनी सरस्वतीला, त्या देवीचे बोल बोलते

स्वये  वर्णुनी राम प्रभूंना, बनुनी रामायण ती येते.

 

कधी घोषुनी जयोस्तुते ती, ज्वाला बनते स्वातंत्र्याची

कमलेच्या रूपाने येते, कधी भिंतीवरती काट्या मधुनी.

 

कधी होऊनी प्रतिबिंब कुणाचे, प्रेमच दिसते मूर्त मनोरम

कधी देवाच्या गाभाऱ्यातून, कविता होते धूप सुगंधित.

 

कधी होऊनी शब्दच ईश्वर, गात राहतो तो ज्ञानेश्वर

अभंग बनुनी कधी तुकयाचे,वर्णन करिते हरिनामाचे

 

हर्ष मानसी उधळत येते, श्रावणातल्या सरी पाहुनी

हसते, रडते, बागडते ती, खोल मनाच्या पडद्यावरती. 

 

कविता नसते आशावादी, कधीच नसते नैराश्याची

ती तर केवळ असते छाया, मनातल्या त्या निमिषार्धाची.

 

कधी मनाच्या गाभाऱ्यातील, कुपितले ते बनते अत्तर

कधी दऱ्यांच्या खोल मनातील, सापडलेले असते उत्तर.

 

विनय वैद्य 

   १९ फेब्रुवारी २०१७

No comments:

Post a Comment

Boardroom

  Boardroom    ****   Looking at the numbers, down and grim They thought of a plan to bring cheer and grin.   They vowed to plant seeds ...